आठवडा विशेष टीम―
कोल्हापूर, दि. 6 (आठवडा विशेष): भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत दि. 7 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. वेधशाळेने दिलेल्या पावसाच्या अंदाजानुसार सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ संभवत असून पाणी पातळीमध्ये 5 ते 6 फुटांची वाढ होऊन दिनांक 7 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा आधी पाणीपातळी धोका पातळीस पोहचण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येत आहे.