राज्यातील चार शहरांमध्ये ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली दि. 7 : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे लाभार्थी फेरीवाले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी देशातील ७५ शहरांमध्ये ‘स्वनिधी महोत्सव’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्रातील चार शहरांचा यात समावेश आहे.

येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री  हरदीपसिंह पुरी यांनी स्वनिधी महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा केली. मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी आणि अपर सचिव संजय कुमार यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  देशातील ३३ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ७५ शहरांमध्ये ९ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन होणार असून १४ जुलै रोजी नाशिक, १६ जुलै रोजी कल्‍याण डोंबिवली, २२ जुलै रोजी मूर्तिजापूर ( जि. अकोला ) आणि २४ जुलैला नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

असा साजरा होणार महोत्सव

या महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसह,डिजिटल आदान-प्रदान विषयक प्रशिक्षण, ऋण मेळावा, फेरीवाले-रस्त्यावरील विक्रेत्यांचा सत्कार, या विक्रेत्यांचे अनुभव कथन आणि योजनेची माहिती व  महत्व विषद करणारे नुक्कड नाटक यांचा समावेश असणार आहे.

कोविड-१९ महामारीमध्ये देशातील फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेत्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटातून बाहेर काढून  त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करता यावा, या उद्देशाने  १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची  देशभर सुरुवात करण्यात आली होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.