पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन आर्थिक मदत केली. तसेच अपघातग्रस्त वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार आणि आवश्यकता भासल्यास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून समुपदेशन करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली.

अपघातग्रस्त वारकऱ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ.गोऱ्हे यांनी जाहीर केलेल्या मदतीचे वाटप सांगली येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते रुग्णालयात जाऊन करण्यात आले. यावेळी या वारकऱ्यांनी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवरे गावातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे आणि परतीच्या प्रवासातही वारकरी यांनी सुरक्षितता बाळगून प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच वारी सुरु असताना त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करावे. पंढरी व इतर वारी मार्गस्थ होण्यासाठी पुढाकार घ्यावा. पोलीस प्रशासनाने सुरक्षित वाहतूक होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिले. यावेळी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. अपघातग्रस्त वारकऱ्यांनी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांचे आभारही मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.