आठवडा विशेष टीम―
सोलापूर,दि.7 (जिमाका) :- कोरोनाचे निर्बंध उठल्याने आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी येण्याची शक्यता आहे. वारकऱ्यांना वारी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे. वारकऱ्यांना आरोग्य, पाणी, स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे जिल्ह्यातील कामकाजाबाबत, आषाढीवारी तयारीबाबत आढावा बैठकीत श्री.वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे आदी उपस्थित होते.
श्री. वाघमारे यांनी मान्सून बाबतची पूर्व तयारी, आषाढीवारी तयारी, सद्यस्थितीतील कोरोना स्थिती, पीक कर्ज वाटप, महावितरण, कृषी विषयक बाबींचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आषाढी वारीमध्ये सर्व प्रकारची जनता असते, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पावसामुळे वृद्ध वारकऱ्यांचे हाल होऊ नये, यासाठी नियोजन करावे. महिलांच्या समस्येबाबत जिल्हा प्रशासनाने माता-बाल स्वास्थ्य, हिरकणी कक्ष स्थापन केल्याने याचे कौतुकही त्यांनी केले.
आपत्ती काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. अशाच प्रकारचे नियोजन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, जेणेकरून जीवित व वित्तहानी टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या वारीमध्ये सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेराचा वापर होत असल्याने तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने वारकऱ्यांना आणि प्रशासनाला याचा लाभ होणार आहे.
सद्यस्थितीमध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणे, खते यांची कमतरता भासणार नाही, या दृष्टीने नियोजन करावे, शेतकऱ्यांकडून खरीप पिकांचा पीक विमा जास्तीत जास्त प्रमाणात उतरून घ्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही हे पाहावे. खरीप पीक कर्ज वाटपामध्ये कोणकोणत्या बँकाचा किती टक्के सहभाग आहे, याबद्दलची सुध्दा माहिती त्यांनी यावेळी घेतली.
कोविडचे लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. बुस्टर डोसबाबतही नागरिकांना सतर्क करावे. वारी कालावधीमध्ये महत्वाच्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमध्ये व इतर ठिकाणी फायर ऑडीट होणे गरजेचे आहे. हॉटेलमधील अन्न-पदार्थांची तपासणी वेळच्या वेळी करण्याच्या सूचना त्यांनी केली.
शासकीय कार्यालयात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने विजेचे बील देखील जास्त येत आहे. वीज बिलावरील खर्च टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शासकीय इमारती, शाळा, आरोग्य केंद्रे याठिकाणी प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर करण्याचे निर्देशही श्री. वाघमारे यांनी दिले. विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, प्रलंबित प्रकल्प आणि निधी याबाबत मंत्रालयस्तरावर प्रस्ताव सादर करावेत, याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन श्री. वाघमारे यांनी दिले.
श्री. शंभरकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील विकास कामे, पालखी महामार्गाची माहिती दिली. पालखी मार्गावर प्रशासनाने केलेल्या सोयी-सुविधा, व्यवस्था पाहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री. स्वामी यांनी यावेळी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजनांची माहिती दिली. तसेच याबाबतच्या माहितीचे पुस्तक देखील श्री. वाघमारे यांना देण्यात आले.
आषाढीवारी कालावधी नियोजन कशा प्रकारे करण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती शमा पवार यांनी दिली. यामध्ये आरोग्य, पाणीपुरवठा, शौचालय, पोलीस विभाग, जि.प. विभाग यांचे मार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हा परिषदेने राबविलेला हरीतवारी उपक्रम याचीही माहिती यावेळी देण्यात आली. पालखी मार्गावर 10 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
श्रीमती सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन याबद्दलही माहिती दिली. वारीतील सुरक्षेबाबत, नियोजनाबाबतची माहितीही त्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आलेला ऑपरेशन परिवर्तन खूपच चांगला उपक्रम असून हा उपक्रम देशपातळीवर राबविण्यासाठी पाठपुरावा करू, असेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
तसेच जिल्हा प्रशासनामार्फत वारकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या वारीसंदर्भातील सर्व माहितीची व्हिडीओ क्लिप यावेळी दाखविण्यात आली.
000000