संभाव्य आपत्कालिन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – पालक सचिव विजय वाघमारे

आठवडा विशेष टीम―

बीड, दि. 8 (जि. मा. का.) – मान्सून काळात आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहूनपरस्पर समन्वयाने परिस्थिती हाताळावी. जेणेकरुन जीवित व वित्तहानी टाळता येईल, असे निर्देश राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात आयोजित संभाव्य आपत्कालिन परिस्थिती पूर्वनियोजन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्माजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरीक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मान्सून काळात संभाव्य आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन,विविध यंत्रणा व जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत करण्यात आलेल्या पूर्वनियोजनाबाबत समाधान व्यक्त करुन पालक सचिव विजय वाघमारे म्हणालेआपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी परस्पर समन्वयाने व सतर्क राहून काम करावे. गाव आणि तालुका पातळीवरील यंत्रणेला आपत्तीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची सविस्तर माहिती तयार ठेवावी. पूरपरिस्थितीत नागरिकांची गैरसोय होवू नयेयासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेल्या पूर्वनियोजन व उपाययोजनांबाबत माहिती देवून सर्व संभाव्य आपत्कालिन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज तसेच जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगितले. जिल्हा  परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी जिल्हा परिषद यंत्रणेकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी महसूल, जिल्हा  परिषदेचे संबंधित विभाग, कृषि, आरोग्य आदि विभागांनी पूर्वनियोजन व उपाययोजनांबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून बीड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, अतिवृष्टी काळात  विसर्ग वाढवल्यामुळे बाधित होणारी गावे, यापूर्वी झालेली अतिवृष्टी, पुरामुळे बाधित होणारी गावे, जीवितहानी, नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये दिलेली मदत, विज अटकाव यंत्रणा, आपत्कालिन परिस्थिती रंगीत तालिम, कृषि विभागाकडून खरीप हंगामासाठीची तयारी, पेरणी क्षेत्र, बी-बीयाने व खतांचा साठा, जिल्हा अग्रणी बँकेकडून पीककर्ज वितरण आदिंची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी(सामान्य) धनंजय जगताप, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा अग्रणी बँक व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.