आठवडा विशेष टीम―
नवी दिल्ली, दि. ८ : महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर ॲड. नार्वेकर प्रथमच आज दिल्ली भेटीवर आले. यावेळी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधानसभेसंदर्भात विविध विषयावर माहिती दिली. उभय केंद्रीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला, अशी माहिती ॲड. नार्वेकर यांनी भेटीनंतर दिली.
तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र सदनात आगमन प्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ.निरुपमा डांगे यांनी ॲड. नार्वेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार हे उपस्थित होते.
000000