आठवडा विशेष टीम―
मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8: महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प से सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या 25 वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही जशी संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशीसुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरणावर भर देण्यात येणार आहे.
आपण मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे.
देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई -पुणे एक्सप्रेस वे, तसेच महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल यामुळे महाराष्ट्राला एक गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्त्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहेत. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरिमन पॉईंट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळुरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तात्काळ सुरु करावे असेही श्री. गडकरी म्हणाले.
मेट्रो आणि बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील
महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरु करणे, बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प सुरु केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून केवळ 9 महिन्यात राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर भर दिला. केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनसुध्दा येणाऱ्या काळात नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने कसे पूर्ण होईल यासाठी काम करीत आहे. वेगवेगळया शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्याबरोबरच मुंबई मेट्रोचे कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर असेल. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन 2030 पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
या कार्यक्रमात बोलताना श्रीमती लेखी म्हणाल्या की, भारताच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आजच्या पिढीला समजावे यासाठीच केंद्र शासनाकडून आजादी का अमृतमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. देशाने गेल्या 75 वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात केलेली प्रगती ही महत्त्वपूर्ण आहेच, पण येणाऱ्या 25 वर्षात कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरेल याबाबतही नियोजन करणे शक्य होणार आहे.
याच कार्यक्रमात सीआयआयचे पदाधिकारी यांनीही या कार्यक्रमाची आणि परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.