इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

पंढरपूर, दि.१० :- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

escon

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, श्री.प्रल्हाद दास, भक्तीप्रेम स्वामी, कृष्णकांत दास आदि उपस्थित होते.

escon1

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विश्व बंधुत्व, ऐक्य, एकता, सहिष्णूता, शांती निर्माण करण्यासाठी भुवैकुंठ माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. १५ एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती, बाल संस्कार वर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्त निवास,असे विविध उपक्रम होणार आहे. मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेचा सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे.  राज्याला सुजलाम सुफलाम करुन विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंदीर परिसरातील प्रभुपाद घाटाची पाहणी केली.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.