प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती !

आठवडा विशेष टीम―

नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर किनवट तालुक्यातील सिमेवरचे गाव म्हणून अप्पारावपेठ ओळखले जाते. या गावाची दुसरी ओळख म्हणजे या गावाने आपल्या पंचक्रोशित जपून ठेवलेला निजामकालीन तलाव. हा तलाव गावाच्या माथ्यावर व पायथ्याशी गाव अशी येथील रचना आहे. हा तलाव पाझर तलावात मोडतो. अप्पारावपेठच्या जवळ मलकजाम हे आणखी एक अडीच हजार वस्तीचे गाव आहे. या दोन्ही गावासाठी हा तलाव म्हणजे आधार.

गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हा तलावही भरत आला होता. काल दिनांक 13 जुलै रोजी या तलावातून पाणी लिक होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. ग्रामपंचायतीने महसूल विभाग व पंचायत समितीशी तात्काळ संपर्क साधून हकीकत कळविली. प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले. एक तर पावसामुळे सर्व नदी, नाले तुडुंब भरून वाहत असल्याने मोठी वाहने गावात नेणे शक्य नव्हते. यंत्र सामुग्री असलेली वाहने त्या तलावाच्या काठापर्यंत पोहचविणेही शक्य नव्हते.

हे लिकेच वेळेच्या आत थांबवणे हाच सर्वात मोठा यावर उपाय असल्याचे किनवटचे उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी ओळखले. तहसिलदार मृणाल जाधव, जलसंपदा विभाग, तलाठी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, ग्रामपंचायत यांच्याशी त्यांनी तात्काळ संपर्क साधून लोकसहभागातून हे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले. जलसंपदा विभागाकडून याबाबत तांत्रिक शहानिशा करून घेतली. गावकऱ्यांना आवाहन केले. काही गावकरी आपल्या श्रमदानासह अगोदरच तत्पर झालेले होते.

अभियांत्रिकी स्वरूपातील माहिती आल्यानंतर ही गळती तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लहान मोठी दगडे, माती, माती वाहून जाऊ नये म्हणून त्याला रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात भरून ती पोती ज्या ठिकाणातून पाणी वाहत होते त्या ठिकाणावर लाऊन मोठी संरक्षक तटबंदी तयार केली. गावकरी सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत याठिकाणी काम करत होते. अखेर ती गळती काही प्रमाणात थांबवून पुढे उद्भवू पाहणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून गावाला आणि गावातील ग्रामस्थांना वाचविण्यात यश मिळविले.

लोकांच्या मनामध्ये आपल्या गावातील नैसर्गिक संसाधनाच्या जपवणुकी विषयी असलेली आस्था जागृत झाल्यामुळे हे मोठे कार्य निर्माण होऊ शकले अशी निर्मळ भावना उपविभागीय अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी व्यक्त केली. जी गावे लोकसहभागासाठी दक्ष असतात त्या गावात कोणताही प्रश्न मोठे स्वरुप धारण करण्या अगोदर चुटकीसरशी मार्गी लागू शकतो याचा आदर्श मापदंड आप्पारावपेठच्या नागरिकांनी घालून दिला आहे.

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button