आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 14 :- नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कला आणि कार्यावर आधारित ‘वसंत वैभव’ या विशेष कार्यक्रमाचे उद्या, दि. १५ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ‘वसंत वैभव’ हा कार्यक्रम उद्या, १५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे. वसंत कानेटकर हे लोकप्रिय नाटककार, लेखक, कादंबरीकार आणि थोर विचारवंत होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात कथा- कादंबऱ्या लिहिल्या. ‘वेड्याचं घर उन्हात’ या पहिल्याच नाटकापासून त्यांना लोकप्रियता मिळाली आणि पुढे तब्ब्ल ४३ नाटके त्यांनी लिहिली. प्रेक्षकांनी या सर्वच नाटकांना भरभरुन प्रतिसाद दिला. त्यांच्या अनेक नाटकांचे हजारोंपेक्षा जास्त प्रयोग झालेले आहेत.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे. ‘वसंत वैभव’ या कार्यक्रमाची संकल्पना वैजयंती आपटे यांची असून, लेखन व दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. या कार्यक्रमात चारुदत्त आफळे, अभय जबडे, नितीन कानेटकर, विजय काळे, अविनाश ओगले, राहुल गोळे, सिद्धार्थ कुंभोजकर, राकेश घोलप, नरेंद्र वीर, गौरी पाटील, गौरी रत्नपारखे, चारुलता पाटणकर यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर करणार आहेत.
‘वसंत वैभव’ हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/14.7.22