वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी प्रिमियर आणि राज्य विकास, व्यापार आणि पर्यटन मंत्री रोजर कुक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भारतीय वंशाचे ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई, डेप्युटी प्रिमियरचे चीफ ऑफ स्टाफ नील फर्गस, कौन्सुल – जनरल मुंबई, पीटर ट्रुसवेल, पर्यटन, विज्ञान आणि नवोपक्रम विभागाच्या महासंचालक रेबेका ब्राउन, ऑस्ट्रेलियन डेप्युटी कॉन्सुल-जनरल मायकेल ब्राउन, यांसह अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गवांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे भारताचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा हिस्सा आहे. येथे विविध क्षेत्रासाठी चांगले वातावरण असून पायाभूत सोयी – सुविधाही  मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्र हे आगामी काही वर्षात कृषिसंपन्न राज्य व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान या विषयात काम करण्यास अधिक संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात विकेंद्रित सौर वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या क्षेत्रातदेखील सहकार्य करावे तसेच कोळशाचे वायुकरण या क्षेत्रातदेखील काम करण्यासाठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आगामी काळात विविध विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घेऊन एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोजर कुक यांनी सांगितले, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.  शेती व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी व काम करण्यासाठी  तसेच आगामी काळात महाराष्ट्र व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात येतील. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांचे योगदान आणि असलेल्या विविध संधी याबाबत माहिती दिली.

000

मनीषा पिंगळे/विसंअ/14.7.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.