प्रशासकीय

कोराडी वीज केंद्राचा ॲशपाँड फुटल्याने पाच गावांत पाणी शिरले; जीवितहानी नाही

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 16 : गत तीनचार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस होत आहे. अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा ॲशपाँड फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत पाणी शिरले. यात कुठलीही जीवितहानी झाली नसून सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. जिल्हा प्रशासनाव्दारे त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण करण्यात आले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच नागरिकांना आवश्यक मदत पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज दिल्या. गावात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले असल्यास तातडीने सर्वेक्षण करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

            जिल्हाधिकाऱ्यांनी आज स्वत: प्रत्यक्षरित्या क्षतिग्रस्त बंधाऱ्याची व परिसराची पाहणी केली. विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता (स्थापत्य) राजेश कराडे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) शिरीष वाठ, मुख्य अभियंते  अभय हरणे, राजकुमार तासकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.

            मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोराडी औष्णिक विद्युत केंद्रालगत असलेला खसाळा राख बंधारा क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठ्यामुळे फुटला. त्यामुळे परिसरातील सदर ॲशपाँडमधून खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांमध्ये नाल्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुराचे पाणी शिरले. नजीकच्या कळमना गोदनी कामठी या रेल्वे लाईनवरही काही वेळ पाणी साचले होते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीची उपाययोजना करून ही रेल्वे लाईन काही वेळातच मोकळी केली त्यानंतर अपलाईन  सुरळीत सुरू झाली. अनेक ठिकाणी पाणी शिरले मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही. जिल्हा प्रशासनाव्दारे त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चमू पाठविण्यात आली असून त्यांच्याव्दारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारीही क्षतीग्रस्त झालेल्या बंधारास्थळी उपस्थित असून कंपनीव्दारे बंधारा बुजविण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

            खसाळा राख बंधारा 341 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला असून सुमारे 7 किलोमीटर खोल जागेत राख साठवण करण्यात येते. दुपारच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला असून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे, अशी माहिती वीज केंद्राव्दारे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button