अमरावतीमधील शेतकऱ्याला जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, 16 :  शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अमरावती जिल्ह्यातील म्हसला, ता. बडनेरा येथील शेतकरी रविंद्र मेटकर यांना आज ‘जगजीवन राम अभिनव किसान’ राष्ट्रीय पुरस्काराने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

येथील पुसा परिसरातील  ए.पी. शिंदे सभागृहात आज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चा 94 वा स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  केंद्रीय कृषिमंत्री श्री. तोमर, केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरूषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद्र, आईसीएआर चे महासंचालक त्रिलोचन महापात्र मंचावर उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी शेतीमध्ये विविध प्रयोग करणारे शेतकरी, वैज्ञानिक, संशोधन संस्था, शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना वर्ष 2021 च्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

राज्यातील अमरावती जिल्ह्याचे शेतकरी रविंद्र मेटकर, सोलापुरातील ‘डाळिंब संशोधन संस्था’, आणि बारामती येथून प्रकाशित होणारे ‘सुफलाम’ या प्रकाशनाला केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय मंत्री  श्री. रूपाला यांनी त्यांच्या भाषणात सांगलीमधील युवकाने बैलाच्या मानेवरील ओझे कमी करण्यासाठी बनविलेले ‘रोलींग सपोर्ट’ यंत्राचा उल्लेख करून देशातील तरूण शेतकऱ्यांच्या दृष्टीने कसा सकारात्मक विचार करतात असे श्री. रूपाला या कार्यक्रमात म्हणाले.

नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी रविंद्र मेटकर

रविंद्र मेटकर हे शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करतात. श्री मेटकर यांनी आपल्या शेतामध्ये कुक्कुटपालन केले आहे. यामध्ये दीड लाख अंडी देणाऱ्या कोंबड्या असून यातून त्यांना दिवसाला 90, हजार अंडी मिळतात. या अंड्यांची विक्री ते मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यात करतात.  कोंबड्यांच्या विष्ठेचा उपयोग ते आपल्या शेतात सेंद्रीय खत म्हणून करतात.  यामुळे पीकांच्या गुणवत्तेत आणि  उत्पादनात भरघोस वाढ झालेली आहे.  श्री मेटकर यांनी यावेळी आवाहन केले की, शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय करावा जेणेकरून खेळता पैसा राहील आणि उत्पन्नात वाढही होईल. आज त्यांना  जगजीवन राम अभिनव किसान राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे आहे.

‘वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्कार’ कोरडवाहू क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांना दिले जाते. राज्यातील सोलापूर येथील ‘राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रा’ला वर्ष 2021 चा वसंतराव नाईक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे यांनी स्वीकारला. डाळिंब उत्पादनामुळे  कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाला असल्याचे श्री. मराठे यांनी सांगितले. 1980 च्या दशकात राज्यातील सांगोला येथे प्रथमत: डाळिंबांची लागवड करण्यात आली. 5 ते 10 हजार रूपये कमविणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात यामुळे लाखांची वाढ झाली. सोलापूर येथील संशोधन केंद्राने येथील स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यात हातभार लावला असल्याचे मनोगत श्री. मराठे यांनी यावेळी व्यक्त केले.

शेतीशी निगडीत प्रकाशन संस्थांना ‘गणेश शंकर विद्यार्थी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.  पुणे, बारामती येथील ‘राष्ट्रीय अजैव‍िक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थे’च्या वतीने  प्रकाश‍ित होणाऱ्या ‘सुफलाम’ या हिंदी  पत्रिकेला यावेळी सन्मानित करण्यात आले. पत्रिकेचे संपादक श्री. पाठक आणि डॉ. अजय कुमार सिंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

00000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र.107/दि.16.07.2022

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.