निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल यांनी केली निवडणूक तयारीची पाहणी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १७ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक निरीक्षक तथा केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अमित अग्रवाल यांनी आज विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे स्थापन करण्यात आलेल्या मतदान केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुमलाही भेट दिली. त्याचबरोबर विधानभवनात झालेल्या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांनी निवडणूक तयारीची माहिती घेतली.

श्री. अग्रवाल यांनी आज सकाळी ही भेट दिली. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधिमंडळाचे प्रधान सचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधिमंडळाचे उपसचिव तथा राष्ट्रपती निवडणूक २०२२ चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर, कोविड अधिकारी तथा आयुक्त (आरोग्य सेवा) डॉ. रामास्वामी एन, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. अग्रवाल यांनी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीची माहिती घेतली. मतदारांच्या आगमनापासून त्यांची नोंदणी, प्रत्यक्ष मतदान इत्यादी प्रक्रियेसंदर्भात इत्यंभूत माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर श्री. अग्रवाल यांनी स्ट्राँग रुमला भेट देऊन मतपेटी आणि निवडणूक साहित्याची पाहणी केली.

श्री. अग्रवाल यांनी या पाहणीनंतर विधानभवन येथे बैठकीत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना संबोधित केले. राष्ट्रपती निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने संबंधित विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती जाणून घेतली. कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर सुरक्षा, मतपेटीची विमानाद्वारे होणारी वाहतूक अशा विविध अनुषंगाने यावेळी माहिती देण्यात आली.

या बैठकीस श्री. देशपांडे, श्री. भागवत, श्री. कुडतरकर, डॉ. रामास्वामी एन, श्री. पारकर, श्रीमती बोरकर यांच्यासह आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, पोलीस उपायुक्त राजीव जैन, वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी प्रज्ञा रोडगे, विधानभवन सुरक्षाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, शासकीय मुद्रणालयाचे अधिकारी मनोज वैद्य यांच्यासह अग्निशमन विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदी संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.