संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या दोन्ही परीक्षा दि. २५ जुलै ते दि. २३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एकूण २८१ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षांची प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे दि. १६ जुलैपासून देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत देण्यात आली आहे.

संबंधित संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थींची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरुन डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थींना वितरित करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर येताना प्रवेशपत्रासोबत परीक्षा परिषदेने पुरविलेल्या नमुन्यातील स्वयंघोषणापत्र आणणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्याचे स्वतःचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, फोटो बदल, सही बदल तसेच विषय बदल (हे फक्त त्या त्या विषयाचेच देण्यात येतील.  उदा. इंग्रजी ३० असेल तर इंग्रजी ४०, मराठी ३० असेल तर मराठी ४०, हिंदी ३० असेल तर हिंदी ४०) इ. बाबत दुरूस्ती असल्यास प्रत्येक चुकीस दोनशे रूपये शुल्क आकारण्यात येईल.

संस्थाचालकांनी प्रवेशपत्र निर्गमित झाल्यापासून परीक्षेपूर्वी (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष कार्यालयीन वेळेत येऊन प्रवेशपत्रावर सक्षम प्राधिकारी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची सही व शिक्का घ्यावा, तरच संबंधित विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल.तसेच         सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या संगणक टंकलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावीत. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.