पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण संवेदनशीलतेने करा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

नागपूरदि. 19 : कमी वेळात अधिक पाऊस कोसळल्यामुळे जुलै महिन्यात पूर्व विदर्भावर आभाळ कोसळले आहे. 1 लाख 34 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अतिशय संवेदनशीलतेने व सामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे समाधान होईल अशा पध्दतीने सर्वेक्षण करा. राज्य सरकारचे विदर्भासह राज्यातील पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जिथे शक्य आहे तिथे दुबार पेरणीसाठी मदत करण्याचे निर्देश दिले. खते, बियाण्यांसाठी तातडीने मदत केली जाईल तथापि आता पुराच्या दु:खात असणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे त्यांना योग्य निवारा व जीवनावश्यक सोयीसुविधा द्याव्यात. पशुधन मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत. त्याची गंभीरतेने नोंद घ्यावी. तातडीची मदत म्हणून देण्यात येणारी आर्थिक मदत विनाअवकाश पोहचावी, असे स्पष्ट निर्देश दिले.

गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गडचिरोली दौरा केला होता. त्यानंतरही गडचिरोली जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर असून मध्य प्रदेशपासून सर्व जिल्ह्यातील पाण्याला गडचिरोलीत थोप बसत आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. या जिल्ह्याकडे सर्वाधिक लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे कायम बाधित होणाऱ्या गावांना कायमस्वरुपी उपाययोजना बहाल करण्यात येतील. तुर्तास सर्व जिल्ह्याने तातडीची कामे व दीर्घ मुदतीच्या सुधारणा अशा पध्दतीचे नियोजन करावे. पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा नेमका अंदाज घेऊन वेळेत प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

आढावा बैठक 4 scaled

यावेळी त्यांनी कमी वेळात अधिक पाऊस झाल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देणारी यंत्रणा सक्रीय करण्याचे गरज असल्याचे सांगितले. धरणे सगळी भरलेली आहेत. त्यामुळे आता येणारा पाऊस परिस्थिती गंभीर करु शकतो. पाणीसाठे व त्याचे व्यवस्थापन ‘हायअलर्ट’वर घ्या. अनेक जिल्ह्यांमधील पीक कर्जाची आकडेवारी बघितली असता सरकारी बँकांची कर्ज वाटपातील आकडेवारी कमी आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेला या संदर्भात  विचारणा करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी लसीकरणाबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी बुस्टर डोस घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोरोना संपलेला नाही. पहिला व दुसरा डोस घेतल्यामुळे देशात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. बुस्टर डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पुढील काळात बचाव नाही, त्यामुळे हे अभियान गतिशील करण्याचे त्यांनी निर्देश दिले. ‘हर घर तिरंगा’ हे अभियान स्वातंत्र्याच्या अस्मितेचे अभियान आहे. स्वातंत्र्याचे मोल रोजच्या जीवनाच्या धावपळीत कमी होऊ नये. प्रत्येक घर या अस्मितेला अभियानात जोडले जाईल, याची खातरजमा करा. नागपूर विभागात अमृत सरोवर योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या योजनेतून तयार झालेले तलाव वेगळेपण जपतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विभागातील पूरपरिस्थिती, पेरणी, खतांचा पुरवठा, बियाण्यांची उपलब्धता, आत्तापर्यंत झालेला पाऊस व करण्यात आलेल्या उपाययोजना, मदत कार्य व आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली. पूरपरिस्थिती सोबतच त्यांनी नागपूर विभागातील पीक कर्ज वाटप, कोविड लसीकरण, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’, अमृत सरोवर योजनांची माहिती दिली.

आढावा बैठक 1 scaled

आमदार चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, कृष्णा खोपडे, डॉ. पंकज भोयर, प्रतिभा धानोरकर, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार सुधीर पारवे, डी. मल्लिकार्जून रेड्डी तसेच नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.