प्रशासकीयब्रेकिंग न्युज

आला पावसाळा, तब्बेत सांभाळा : पावसाळी आजाराला प्रतिबंधसाठी उपाययोजना

आठवडा विशेष टीम―

अमरावती दि. 21 (विमाका)- पावसाळा हा ऋतु बालंकापासुन वृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटतो. या  काळात स्वच्छता व आरोग्याची निगा राखणे महत्त्वाचे असते. संसंर्गजन्य आजारही पावसाळ्यात उद्भवतात. त्याच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत  सांगताहेत अमरावतीचे उदरविकार तज्ज्ञ डॉ. पंकज इंगळे.

पावसाळ्यात विविध संसंर्गजन्य आजारांपासुन रक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहुन पावसाचा आनंद घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा आजार वाढून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार वा संसर्ग अंगावर काढू नका. डॉक्टरी सल्ल्यांशिवाय केलेले घरगुती उपचार जीवावर बेतू शकतात त्यामुळे तातडीने डॉक्टरांची मदत घ्या. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळेच अतिसारासारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. अतिसाराच्या लक्षणांमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो. नॉशिया, उलट्या होणं आणि वारंवार शौचाला पातळ होणं. उपाय अतिसारावर करावयाचा घरगुती उपाय म्हणजे ओआरएस पॅक देणं किंवा मीठ, साखर घालून पाणी देणं. रुग्णाच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर टोस्ट, सफरचंद, केळ, शिजलेला भात, लॅक्टोबॅसिलस युक्त दही यांचा समावेश असावा. जर दोन दिवसात काही सुधारणा झाली नाही तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कॉलरा

पावसाळ्यातील अजून एक आजार. व्हिब्रिओ जीवाणूपासून कॉलराची लागण होते. दूषित अन्न व पाणी प्यायल्याने हा आजार होऊ शकतो. अचानक डिहायड्रेशन होऊन जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा येणे हे याचे प्राथमिक लक्षण. तसेच पिण्याच्या पाण्यात उंदीर पडून मेल्याने किंवा पडल्याने पाणी दूषित होऊन हा आजार पसरतो. साथीचा तापः साथीचा आजार हा सर्वसाधारण वर्षभर कधीही होऊ शकतो, परंतु पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. तीन ते सात दिवस सर्दी, खोकला, ताप असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

लेप्टोस्पायरासिस

उंदराच्या मूत्रविसर्जनातून हा जीवाणू गढूळ पाण्यात शिरतो. या पाण्यातून चालताना पायाला झालेल्या जखमा व छोट्या चिरांमधून जंतुसंसर्ग होतो. ताप येणं, डोळे लाल होणं, यकृतदाह, कावीळ व मूत्रपिंडाच्या कामात बाधा येणं ही त्याची लक्षणं. प्रत्येक वेळी मुलांना घराबाहेर पाठवताना गमबूट घालणं शक्य नाही. त्यामुळे गढूळ पाण्यात मुलांना खेळू न देणं तसंच घरी आल्यावर पाय स्वच्छ धुणं आणि पायांवरील छोट्या-मोठ्या जखमांवर त्वरित औषधोपचार करणं हा लेप्टोच्या प्रतिबंधाचा सोपा उपाय आहे.

पोटाचा संसर्ग

उलटी, जुलाब आणि पोटदुखी हे सर्वसाधारण पोटाच्या संसर्गाची लक्षणे व या वातावरणात पोटदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अस्वच्छ अन्नपदार्थ किंवा द्रवपदार्थांचे सेवन केल्याने पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता दिसून येते. म्हणून शक्यतोवर पाणी उकळून प्यावे, तसेच घरतील अन्नपदार्थ खाणे व जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यास चांगले.

कावीळ

अशुध्द पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात कावीळ हा आजार हमखास होऊ शकतो. थकवा, लघवीचा व डोळ्यांचा रंग पिवळसर होणे, उलटी, यकृतामध्ये बिघाड आदी लक्षणे दिसून आल्यास कावीळीची शक्यता व्यक्त केली जाते. डोळे लालसर होणे हे ही एक महत्त्वाचे लक्षण म्हणून पाहिले जाते. कावीळ मुख्यत्वे विषाणू ए आणि ई मुळे होते. लहान मुले व गरोदर महिलांमध्ये कावीळ आजाराबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असून दीर्घकालीन कावीळीबाबत अतिदक्षता आवश्यक आहे. तसेच पायांना सूज आल्यासही दुर्लक्ष करू नये.

मलेरियाची लक्षणं

पोटात दुखणं, थंडी वाजणं आणि घाम येणं, अतिसार, नॉशिया आणि उलट्या, ताप चढणं, स्नायू दुखणं आणि चक्कर येणं. मलेरिया होऊ नये याकरता कोणती काळजी घ्यावी. लांब हाताचे कपडे घाला, डासांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणी तसंच औषधांचा उपयोग करा. पाणी साठून राहाणार नाही याची काळजी घ्या. जर दोन दिवसांपासून एखाद्या व्यक्तीला बराच ताप चढत असेल तर रुग्णाला डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.

डेंग्यूची लक्षणं

अचानकपणे खूप ताप येणं, तीव्र डोकेदुखी, डोळ्यामागे दुखणं, सांधे आणि स्नायू खूप दुखणे, नॉशिया, उलट्या, त्वचेवर ऍलर्जी उठणं, ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ती दिसून येतात.

मलेरिया, डेंग्यू

मलेरियामध्ये दर एक दिवसाआड थंडी भरून ताप येतो. पण लहान मुलांमध्ये उलट्या, जुलाब, रोज एकदा किंवा दोनदा ताप येणं अशा लक्षणांमुळे निदानात संदिग्धता निर्माण होते. डेंग्यूचा विषाणू एडिस नावाच्या डासामार्फत होतो. तीव्र ताप, हात- पाय मोडून येणं आणि अंगावर विशिष्ट प्रकारचे पुरळ येणं ही या आजाराची लक्षणं. विषाणूंमुळे होत असल्याने हा आजारही स्वनियंत्रित असतो, मात्र अनेकदा गुंतागुंत होण्याची शक्यता ताप उतरताना असते. म्हणून डॉक्टरमंडळी एकापेक्षा अधिक वेळा रक्तचाचणीचा सल्ला देतात. या दोन्ही आजारांवर प्रतिबंधक लस नाही. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची वाढ होत असल्याने पाणी साठू न देणं हा चांगला उपाय. याशिवाय कीटकनाशक औषधांची फवारणी आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी मॉस्किटो रिपेलन्ट क्रीम, मच्छरदाणी असे उपाय करावेत. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.

डॉ. पंकज इंगळे

एम.डी.(औषधशास्त्र), अमरावती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button