राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस; एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)च्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १२ तुकड्या तैनात आहेत.

नांदेड-१, गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरते निवारा केंद्र तयार करण्यात आले आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल देण्यात येत आहे.

00000

संध्या गरवारे/विसंअ/27.7.22

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.