प्रशासकीयब्रेकिंग न्युज

स्वामी विवेकानंद यांनी दाखवलेल्या मार्गावर दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न करावा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ३१ :  स्वामी विवेकानंदांनी देशाला ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हे ध्येयवाक्य दिले. स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत ध्येय गाठायला अनेक वर्षे लागू शकतील. प्रत्येकाला विवेकानंद किंवा शंकराचार्य होता येत नाही; परंतु प्रत्येकाने स्वामी विवेकानंदांनी दाखवलेल्या वाटेवर किमान दोन पावले तरी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच रामकृष्ण मिशनच्या स्थापनेला 125 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबईच्या रामकृष्ण मिशनच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

अज्ञान अंधश्रद्धेत गुंतलेला देश ही भारताची प्रतिमा बदलवून स्वामी विवेकानंद यांनी जगाला भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवले. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून एक जागतिक सेवाभावी संघटना उभी केली.  मिशनने केवळ ध्यान-धारणा, पूजा पाठ यापुरते आपले कार्य मर्यादित न ठेवता शाळा, महाविद्यालये व इस्पितळं निर्मिती केली. भारतीय तत्वज्ञानाला पाश्चात्य विज्ञानाची जोड दिल्यास जग खऱ्या अर्थाने सुखी, आनंदी होईल असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेला संबोधित करताना त्यांनी वापरलेले  ‘बंधूंनो आणि भगिनींनो’ हे केवळ शब्द नव्हते तर  त्या संबोधनामध्ये मानवतेप्रती प्रेम व आपुलकीचा भाव ओतप्रोत भरला होता. विवेकानंदांनी भारतीय प्राचीन ज्ञान जगासमोर नव्या रीतीने मांडले असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांनी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद आणि माँ शारदा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांनी स्वागतपर भाषण केले तर बेलूर मठ येथील सहायक महासचिव स्वामी सत्येशानंद यांनी ‘मातृभूमीला पुन:श्च समृद्ध आणि शक्तिशाली कसे बनवता येईल’ या विषयावर मार्गदर्शन केले. रामकृष्ण मिशन मुंबईच्या आयोजन समितीचे अध्यक्ष एस. एम. दत्ता यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला स्वामी निखिलेश्वरानंद तसेच मिशनच्या देशातील विविध केंद्रांचे अध्यक्ष तसेच निमंत्रित उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button