पीएम गतिशक्ती आराखड्यांतर्गत पाचोरा-जामनेर मार्गाच्या गेज परिवर्तन व विस्ताराची शिफारस

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली दि. 4 : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार करण्याची शिफारस ‘प्रधानमंत्री (पीएम) गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्या’ च्या नियोजन गटाने  केली आहे.

‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्या’च्या संस्थात्मक चौकटीअंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने परीक्षणाअंती बुधवारी पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गासह देशातील एकूण तीन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची शिफारस केली असल्याचे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दुर्गम भागातील माल वाहतुकीला गती मिळण्यासाठी  आणि  वाहतूक  खर्चात कपात होण्याच्या अनुषंगाने हे तीन्ही  प्रकल्प महत्वाचे आहेत.

पाचोरा-जामनेर रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन व विस्तार

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्ताराच्या या ८४ कि.मी.च्या प्रकल्पासाठी ९५५ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. या प्रकल्पामुळे जळगाव आणि भुसावळला  बाह्य  दुहेरी मार्ग जोडला जाणार असून यामुळे नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)  ते  नागपूर आणि देशाच्या पूर्वेकडील राज्यांत जलद गतीने मालवाहतूक करण्यास मदत होणार आहे.

३००० दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून पीएम  गतिशक्तीच्या नियोजन गटाने देशातील तीन महत्त्वाचे प्रकल्प निश्चित केले आहेत. शिफारस केलेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पासह उत्तर प्रदेशातील गोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि बिहार व पश्चिम बंगालमधील कटिहार-मुकुरिया आणि कटिहार-कुमेदपूर मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पांचाही  समावेश आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.