प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जिल्ह्यातील ५०हजार शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ

आठवडा विशेष टीम―

नांदेड (आठवडा विशेष) दि. 5 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष विजय जोशी, उर्दू संपादकांच्यावतीने अल्ताफ सानी, संपादक प्रदिप नागपूरकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील बचतगटांना आपण जाणीवपूर्वक तिरंगा वितरणाची, तिरंगा विक्री करण्याची जबाबदारी दिली आहे. सुमारे दीड लाख तिरंगा त्यांच्यामार्फत आपण घेत आहोत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय परिसरात त्यांना तिरंगा विक्रीसाठी जागाही देत आहोत. अप्रत्यक्षरित्या त्यांना यातून मदत व्हावी हा उद्देश आहे. तिरंगाबाबत शासनाचे निर्देश व त्याबाबतच्या नियमांची स्पष्ट कल्पना सर्वांना दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभिनव उपक्रमासाठी माध्यमांचे प्रतिनिधी आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास तत्पर आहेत. या उपक्रमात लोकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी व्यापक प्रसिद्धीवर आम्ही भर देऊ असे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सांगितले.

यावेळी प्रातिनिधी स्वरुपात उपस्थित सर्व सन्माननिय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना तिरंगा देण्यात आला. प्रत्येक शासकीय अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या योगदानातून गरीब तीन कुटुंबांना तिरंगा देणार आहेत.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button