‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त हिंदी साहित्य अकादमीतर्फे मुंशी प्रेमचंद यांच्या कथांचे सादरीकरण

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 5 : राज्यात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.  याअंतर्गत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय (स्वायत्त), घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवडक कथांचे सादरीकरण करण्यात आले.

हिंदी भाषा आणि साहित्याच्या सर्वांगीण विकासासाठी या अकादमीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. नुकतीच अकादमीच्या कार्यकारी समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. या समितीच्या कार्याध्यक्षपदी अभिलाष अवस्थी यांची नेमणूक झाली आहे. कार्याध्यक्षांच्या उपस्थितीत हा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

hindi sahitya1

यात मुंशी प्रेमचंद यांच्या “बडे घरकी बेटी”, “प्रेरणा”, “कातील”, “सच्चाई का उपहार”, “भूत” या 5 कथांचे सादरीकरण करण्यात आले. एकेक कथा सादरीकरणानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कथांशी संबंधित प्रश्न विचारून, योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष अभिलाष अवस्थी यांच्या हस्ते प्रेमचंद यांचे पुस्तक बक्षीस म्हणून भेट देण्यात आले.

या कथांचे दिग्दर्शन आयडीयाचे संचालक तथा ज्येष्ठ दिग्दर्शक मुजीब खान यांनी केलेले होते. या कार्यक्रमासाठी हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह आणि माजी प्राचार्य तथा निर्देशिका डॉ. उषा मुकुंदन यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सदस्य सचिव सचिन निंबाळकर, प्राचार्य हिमांशु दावडा, हिंदी विभाग प्रमुख डॉ.मिथिलेश शर्मा यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.