प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाने रंगभूमीवरील सदाबहार चेहरा हरपला!

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 9 : ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

जेव्हा फक्त दूरदर्शनचा जमाना होता, त्या मनोरंजनाच्या प्रारंभीच्या काळात अनेक मालिकांच्या माध्यमांतून घराघरात ते पोहोचले आणि नंतर अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली स्वत:ची अमिट अशी छाप उमटवली. ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.