प्रशासकीय

निवासी आयुक्तांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरण        

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली, १3 : सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ.निधी पांडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची सुरुवात झाली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आजपासून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही आजपासून ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आज कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदनाच्या परिसरात निवासास असणाऱ्या-अधिकारी कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जाऊन यावेळी निवासी आयुक्तांनी राष्ट्रध्वज वितरित केले व हे ध्वज आप-आपल्या घरावर लावण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत सदनातील घराघरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ असे नारे दिले व वातावरण देशभक्तीमय झाले होते.

यावेळी डॉ निधी पांडे यांनी सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा,माहिती अधिकारी अंजू निमसरकर ,उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरीत केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रातही राष्ट्रध्वजाचे वितरण

‘घरोघरी तिरंगा अभियानां’तर्गत महाराष्ट्र परिचय केंद्रातही उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांच्या हस्ते कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.

खाद्य महोत्सवाचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात येत्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र दिनी महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सदनाच्या उपहार गृहात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत या खाद्य महोत्सवात सहभागी होत दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या पारंपरिक व्यंजनांचा आस्वाद घेता येणार आहे. या खाद्य महोत्सवात राज्याच्या वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडणार असून या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लज्जतदार खाद्य पदार्थांचा खवय्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्तांनी केले आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थ सशुल्क असतील.

000000

वृत्त वि. क्र. १30  / दिनांक 13.08.2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button