आठवडा विशेष टीम―
ठाणे, दि. १४ (जिमाका): ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद भिकनराव अहिरराव यांना कारागृहातील उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री.अहिरराव हे १९९५ मध्ये कारागृह विभागात तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले. आतापर्यंतच्या २७ वर्षाच्या कालावधीत त्यांनी येरवडा, नाशिक, नागपूर, मुंबई या अति संवदेशनशील मध्यवर्ती कारागृहांचे तुरुंगाधिकारी, उपअधीक्षक या पदावर सेवा केलेली आहे. ठाणे येथे ते २०१९ पासून अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहतांना त्यांनी कारागृहातील बंद्याच्या सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या हेतूने बंद्यांना विनातारण कर्ज, प्रौढ साक्षरता अभियान/उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, कोवीड कालावधीत बंद्यांच्या नातेवाईकांना सामाजिक संस्थेच्या सहाय्याने रेशन पुरवठा, गरीब व गरजू बंद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने मोफत कायदेविषयक सहाय्य मिळवून देण्याकरीता प्रयत्न केले, कारागृहातील बंद्याकरीता योगा, मेडीटेशन, वैद्यकीय शिबीरे आयोजित केले, बंद्यांच्या आहारात सुधारणा होण्यासाठी ॲटोमॅटीक चपाती मेकींग मशीन, बल्क प्रेशर कुकर, सोलर वॉटर हिटर, जिम, हॉट-पॉट, इत्यादी अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात पुढाकार घेतला.
‘विद्यादानम’ प्रकल्पाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षात त्यांनी ३००० बंद्यांना साक्षर करुन मुलभूत शिक्षण दिले. अशा प्रकारे सुधारणात्मक कार्यक्रम त्यांनी राबविले. बंदी प्रत्यार्पन मोहिमेअंतर्गत देान वेळा मॉरशिअस येथे ते गेले आहेत. श्री. अहिरराव यांच्या एकूण २७ वर्षातील उल्लेखनिय कामगिरी करीता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे.
श्री. अहिरराव यांनी २०१६ ते २०१९ या काळात मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कारागृहातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात कामे केली. २०१८ श्री.अहिरराव यांना कारागृहातील उल्लेखनिय कामगिरी करीता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, पुणे यांचे सन्मान चिन्ह (DG Insignia) देऊन गौरव करण्यात आलेला आहे.