आठवडा विशेष टीम―
पुणे दि. १४: महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. राज्यात साहित्यनिर्मितीसाठी उत्तम वातावरणदेखील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे आयोजित ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुस्तकाचे लेखक डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.
श्री. कोश्यारी म्हणाले, संत साहित्याने समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. मराठी वृत्तपत्रातून साहित्य, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध विषयांबाबत उत्तम लेखन पाहायला मिळते. उत्तम साहित्यनिर्मितीमुळे इथले ज्ञानभांडार विस्तारले आहे. अनेक लेखकांनी यात भर घालण्याचे कार्य केले.
पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणामुळे शिष्यांना भ्रमण करावे लागत असल्याने त्यांना जीवनाचे अनुभव मिळायचे, समाजाविषयी आकलन व्हायचे. विद्यार्थ्यांना अनुभवसिद्ध करणारे असे शिक्षण आवश्यक आहे. विद्यापीठातून सिद्धांत शिकल्यानंतर समाजात मिळणारे व्यावहारिक ज्ञानही महत्वाचे आहे. ‘चाकोरी बाहेरचे शिक्षण’ या पुस्तकाच्या माध्यमातून चार भिंतीच्या बाहेरील जगातील शिक्षणाचा चांगला परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे राज्यपाल म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्य होत असून आदिवासी बांधवांनी बनविलेल्या बांबूच्या राख्यांची एनएसएसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, नैसर्गिक शिक्षणाच्या आधारे समाजाची उन्नती साधता येईल. पुस्तकातून अशा शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे अनुभव वाचायला मिळतात. डॉ.चाकणे यांनी सामाजिक जाणिवेतून पुस्तक लिहिले असून ते विविध भाषेत प्रकाशित करावे.
यावेळी श्री.पांडे आणि श्री. गोयल यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ.चाकणे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. पुस्तक नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित असून शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि डॉ.चाकणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.