प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे ४८ तासांत पंचनामे करा

आठवडा विशेष टीम―

उस्मानाबाद,दि.15(आठवडा विशेष):-गेल्या महिनाभर सततचा पाऊस सुरू आहे.काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या दोन्ही कारणांबरोबरच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.कृषी विभागाने पीक पाहणीचे काम सुरू केले आहे, परंतु उर्वरित क्षेत्राची पीक पाहणी येत्या 48 तासांत करून अहवाल सादर करावेत,असे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यानी आज येथे दिले.

स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जि.प.चे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी विकास जाधव,ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक सौ.प्राजंल शिंदे,जिल्हा नियेाजन अधिकारी अर्जुन झडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के.पाटील,उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेद्रकुमार कांबळे,उपविभागीय कृषी अधिकारी टी.बी.बिराजदार,तहसीलदार प्रवीण पांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहेत,त्याबाबत कृषी विभागानी पीक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे पण अजूनही काही ठिकाणी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम बाकी आहे, ते काम येत्या 48 तासांत पूर्ण करून शासनास अहवाल सादर करावा,असे आदेश देऊन प्रा.डॉ.सावंत यांनी जिल्हयातील पीक परिस्थती, पावसाचे प्रमाण,धरणांची, रस्त्यांचे बांधकाम,आणि नागरिक- शेतकऱ्याच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासनास काही सूचना यावेळी दिल्या.

दरम्यान,आतापर्यंत जिल्हयात 449:40 मी.मीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या 59.11 टक्के पाऊस झाला आहे.सार्वत्रिक 569.7 मी.मीटर पावसांची नोंद उमरगा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस परंडा तालुक्यात 354.2 मी.मीटर झाला आहे जिल्हयाचे खरीप हंगामाचे सरासरीचे क्षेत्र 5 लाख 79 हजार 11 हेक्टर आहे.त्यापैकी प्रत्यक्षात 5 लाख 41 हजार 306 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी 93 टक्के आहे.जिल्हयात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. या पीकाचे सरसरी क्षेत्र 2

लाख 84 हजार 300 हेक्टर असताना यावर्षी 4 लाख 35 हजार 206 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.त्याचे प्रमाण 153 टक्के आहे,अशी माहिती ही यावेळी देण्यात आली.

जिल्हयात सहा लाख 68 हजार 113 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अर्ज केले आहेत. 5 लाख 1 हजार 719 हेक्टरवरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. प्रधानमंत्री पीक विम्याअंतर्गत आतापर्यंत 44 हजार 15 शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत तक्रारी दाखल केल्या आहेत.

अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या शेतीतील पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करावयाच्या अंदाजित शेतकऱ्यांची संख्या एक लाख 74 हजार 113 आहे. त्यातील एक लाख 55 हजार 729 हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे.आतापर्यंत जिल्हयातील 97 हजार 57 शेतकऱ्यांच्या 85 हजार 401 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले आहेत. 77 हजार 55 शेतकऱ्यांच्या 70 हजार 328 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.आतापर्यंत 54.84 टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी.समाजात अशांतता निर्माण करू शकणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवून त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, गुप्तचर यंत्रणा अर्थात सीआयडीला सक्षम करून त्यांचा वापर करावा,असे सांगून प्रा.डॉ.सावंत यांनी राष्ट्रीय महामार्गावरील रोड डिव्हायडर अनाधिकृतपणे काढून नियमाचा भंग करणाऱ्यावर कार्यवाही करावी,असे ठिकाणे शोधून रोड डिव्हायडर चे काम पूर्ववत करावे म्हणजे अपघात होणार नाहीत,अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हयातील शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मावेजा मिळाला पाहिजे.त्यासाठी रेडी रेकनरचे दर निश्चित करताना प्रत्यक्ष स्थळ भेटी देऊन सर्वेक्षण करून रेडी रेकनरचे दर निश्चित करावेत म्हणजे विकास कामांसाठी शेतकरी आपल्या जमीनी देण्यास तयार होतील,असे सांगून त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देताना होणारी दिरंगाई दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्रूटी दूर करून लाभार्थ्यांना जलद गतीने न्याय द्यावा,असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन त्यासाठी विशेष बैठक घेऊन येथील या महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button