आठवडा विशेष टीम―
मुंबई दि. 16: ज्यांच्या असीम त्यागामुळे आज देशवासीय स्वातंत्र्य अनुभवत आहेत अशा अनेक ज्ञात अज्ञात, अनाम देशभक्तांचे, त्यांच्या असीम त्यागाचे, बलिदानाचे स्मरण करण्यात आले. निमित्त होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर, सुश्राव्य ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ कार्यक्रमाचे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, अभिनेत्री स्पृहा जोशी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पु.ल.देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव ‘उत्सव स्वातंत्र्याचा’ हा कार्यक्रम देशभक्तीपर गीतगायन यावर आधारित होता.
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित या कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी एकाहून एक लोकप्रिय देशभक्तीपर गीते सादर केली. पूजा पंत व त्यांच्या शिष्यांनी देशभक्तीपर गीतांवर कथ्थक नृत्य सादर केले.
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतिवीर उमाजी नाईक, प्रद्योतकुमार भट्टाचार्य, मोहित मित्रा यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या देशकार्याची महती सांगण्यात आली. अकोल्याचे जयंत सहस्त्रबुद्धे यांनी या क्रांतिकारकांच्या आठवणींचे अज्ञात पैलू संकलित केल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान अभिनेता विघ्नेश जोशी यांनी दिली.
अभिनेता राहुल मेहंदळे व अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर कविता व उताऱ्यांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. विनित गोरे यांनी या सादरीकरणासाठी संकल्पना विस्तार केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
0 0 0
वृत्त: उपसंपादक श्री. नारायणकर