४०.९५ कोटींच्या बनावट बिल घोटाळाप्रकरणी एकास अटक

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 18 : 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या 7.37 कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक केली. अतुल नामदेव अहिरे, मे. अहिरे एंटरप्राईज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नांव असून, महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ यांनी एका दिली आहे.

मे. अहिरे एंटरप्राईजच्या बोरीवली, विलेपार्ले येथील व्यावसायिक ठिकाणी पथकाने भेटी दिल्या. 40.95 कोटी रुपयांच्या बनावट देयके वितरित करुन त्याद्वारे 7.37 कोटींचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित केले. तसेच 8.21 कोटी रुपयांच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला. दरम्यान 5 ऑगस्ट रोजी मे. शहा एंटरप्राईजेसच्या मालकाला करचुकवेगिरीप्रकरणी अटक करण्यात आली होती तर, मे. एस. के. स्टार या आस्थापनाच्या व्यापाऱ्याला देखील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली होती.

राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व आनंद गवळी यांनी ही मोहिम राबवली.

०००

वृत्त/ श्री. नारायणकर, उपसंपादक

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.