कृषी मंत्र्यांकडून अतिवृष्टीबाधित भागाची पाहणी

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 20 :  कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर बाधित भागाची पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चांदुर बाजार तालुक्यातील रोहणखेड येथे त्यांनी भेट दिली.  तेथील रामरावजी पचारे यांच्या शेताची पाहणी केली. शेतजमीन खरडून निघाली असून सोयाबीन व कापसाच्या पीकाच्या झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नजिकच्या पेढी नदीचे पाणी शेतात पसरुन पिकांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन नदीचे खोलीकरण आदी कायमस्वरुपी उपाय अंमलात आणण्याबाबत आराखडा तयार करुन शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा. शेतात येणारा अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

कृषी मंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अतिवृष्टीमुळे बाधित रस्त्याबाबत दुरुस्ती व बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.