ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या कामास गती देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

ठाणे, दि. 22 (आठवडा विशेष) :- ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाच्या अशा 900 खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारती संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथिगृहात बैठक घेऊन रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील  प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके व ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे.

ठाणे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेतील विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध कामांचे प्रशासकीय मान्यता मिळविण्यासंदर्भात श्री. चव्हाण यांनी निर्देश दिले.

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम जलदगतीने सुरू व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी  निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करण्याचे निर्देश मंत्री श्री. चव्हाण यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत श्री. चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, महापालिकेचे सहाय्यक नगर नियोजनकार सतीश उईके, अशोक राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणेचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आदी उपस्थित होते.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.