बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 27 :प्रत्येक व्यवसाय व व्यापाराची उभारणी नैतिकता व सचोटीच्या पायावर असावी. बांधकाम व्यवसायिकांनी नैतिकता व चारित्र्य जपले तर ती देशाची आणि ईश्वराचीदेखील सेवा ठरेल, असे सांगताना बांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.

बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिक व वास्तुरचनाकार यांना देण्यात येणारे 17वे  कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आर्किटेक्ट व बिल्डर पुरस्कार  राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) मुंबई येथे देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

एसाप (ASAPP)  ग्लोबल इन्फो ग्रुप या माध्यम समूहाच्या वतीने राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पुरस्कार निवडक वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले.

देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रनिर्माण करण्यावर सातत्याने भर दिला आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान देणे अपेक्षित आहे. बांधकाम व्यवसायात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलांचा अंगीकार करुन बांधकाम व्यावसायिकांनी सर्वोत्तम कार्याची कास धारावी, असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला फर्स्ट कन्स्ट्रक्शन कौन्सिल व कंस्ट्रक्शन वर्ल्डचे संस्थापक प्रताप पदोडे व सह-संस्थापिका फाल्गुनी पदोडे प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते वास्तुरचनाकार आभा नारायण लांबा असोसिएट्स, सी पी कुकरेजा, डीएसपी डिझाईन, एडिफीस कन्सल्टंट्स, पी जी पत्की व संजय पुरी आर्किटेक्टस यांना तसेच सर्वोत्कृष्ट बिल्डर पुरस्कार निरंजन हिरानंदानी. के रहेजा कॉर्प, महिंद्रा लाईफस्पेसेस, प्रेस्टिज आदींना देण्यात आले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.