हनुमंतखेड्याचा विवाह सोहळा ठरला आदर्श
आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव,ता.१८:हनुमंतखेडा (ता.सोयगाव) ग्रामस्थाच्या वतीने पहिल्यांदाच समाजमन जुळविण्यासाठी आणि जातीपातीला थारा न देता दोन जोडप्यांना शुक्रवारी रात्री चंद्राच्या प्रकाशात आंतरजातीय विवाहबद्ध केले,परंतु विवाहाच्या बंधनात अडकताच त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिल्याने या सोहळ्याची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.दरम्यान हनुमंतखेड्यात झालेल्या विवाह सोहळ्यातील दोन्हीही मुली अनाथ असल्याने संजय गांधी निराधार तालुका समितीचे अध्यक्ष राजेंद्र राठोड यांनी मानसकन्या मानले होते.
हनुमंतखेड्यातील दोन तरुणांचे मानसकन्याशी विवाह जुळवून हनुमंतखेडावासियांनी राज्यभर आगळा वेगळा संदेश दिला असून या विवाह सोहळ्यात अनाथ असलेल्या दोन्ही मुलींना आई-वडील नसल्याने गावातीलच दोन तरूणासोबत त्यांना विवाहबद्ध केल्याने,दुष्काळात या नवदाम्पत्यांना गावाने मदतीचा हात दिला आहे.निराधार समितीचे अध्यक्ष राजेंद्र राठोड,सरपंच दादाभाऊ राठोड यांच्या कल्पनेतून हा आगळावेगळा विवाह सोहळा आख्ख्या गावाने मोठ्या थाटामाटात पार पाडला,विवाहा दरम्यान अनेक मान्यवरांनी हजरी लावली होती.ग्रामपंचायतीच्या वतीने तातडीने या दोन्ही जोडप्यांना विवाहाच्या बंधनात अडकताच नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आल्याने या उपक्रमात आणखी नवीन भर पडली होती.
विवाह सोहळ्यात आख्खा गाव थिरकला-
दरम्यान गोरज मुहूर्ताच्या योगावर आयोजित या विवाह सोहळ्यात आख्खा गाव थिरकल्याने गावभर विवाहाच्या आनंदाची मोठा उत्सव साजरा करण्यात आला होता.
दरम्यान या जोडप्यांना विवाह बद्ध होताच कन्नडचे उदयसिंग राजपूत,नितीन बोरसे,नंदू सोळून्खे,सुभाष वाडकर,संतोष बोडखे,तालुका प्रमुख दिलीप मचे आदींच्या हस्ते विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.