सोयगाव तालुक्यात शासकीय चारा छावणी मंजूर,बनोटी परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना दुष्काळात दिलासा

आठवडा विशेष | ज्ञानेश्वर धोंडू पाटील

सोयगाव,ता.२०: सोयगाव तालुक्यातील दुष्काळातील दाहकता मे महिन्याच्या अखेरीस गंभीर स्थितीकडे वाटचाल करत असतांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने बोरमाळतांडा(जंगलीकोठा)येथील गोशाळेत एक चारा छावणी मंजूर केल्याने दुष्काळात शेतकऱ्यांच्या जनावरांना दिलासा मिळाला आहे.उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी तातडीने सोयगावला दिलेल्या पत्रावरून या चारा छावणीची कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.
सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळात ऐन दुष्काळात चाऱ्याची निर्माण झालेली तुट आणि दुष्काळात निर्माण झालेली चाराटंचाई यामुळे जनावरांची मोठे हाल होत असल्याने श्री शनेश्वर देवस्थान वाकी ता.कन्नड यांच्या मागणीवरून बोरमाळतांडा येथील गोशाळेत ही छावणी मंजूर करण्यात आली आहे.या छावणीत बनोटी परिसरातील जनावरांना मोफत चार्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.दरम्यान दुष्काळाच्या अखेरच्या टप्प्यात बोरमाळतांडा येथील गोशालेला शासकीय अनुदानावर श्री शनेश्वर देवस्थान वाकी या संस्थेला ही छावणी चालविण्यास देण्यात आली आहे.सोयगाव तालुक्यात पाण्यासोबतच चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने पाहिलंय टप्प्यात बोरमाळ तांडा येथे चारा छावणी मंजूर करण्यात आली आहे.बनोटी परिसरातील जनावरांना या छावणीत दावणीला बांधण्याचे आवाहन तहसीलदार प्रवीण पांडे यांनी केली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.