ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमीचा आधारवड हरपला

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 30 : ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमीचा आधारवड हरपला आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केली.

श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, गणेश नायडू यांनी ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर यांच्या सोबतीने हौशी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटके दिली आहेत. राज्य शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांची अनेक नाटके पारितोषिक प्राप्त ठरली. उत्तम नेपथ्यकार, दिग्दर्शक अशी भरीव कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांच्या कौशल्यातून साकारलेले अनेक नाटकांचे नेपथ्य प्रेक्षकांना भुरळ घालायचे. त्यांनी विदर्भातील हौशी रंगभूमीच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले.

श्री.गणेश नायडू यांच्या निधनाने नाट्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो व त्यांच्या पुण्यात्म्याला सद्गती प्राप्त होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/30.8.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.