आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही. कलाकारांच्या चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते. साहित्य, कला यातून साकारलेले समृद्ध विचार आपण कधीच खोडू शकत नाही. ते कायमस्वरूपी मनात राहतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत जहांगीर कला दालनात भरविण्यात आलेल्या ‘फोर स्टोरीज’ या कला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी माजी आमदार राज पुरोहित, माजी खासदार विजय दर्डा, सौ. अमृता फडणवीस, कलाकार जयश्री भल्ला, रचना दर्डा, बीना ठकरार, लोकमत वृत्तपत्र मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी तसेच अनेक कलाकार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कला, संस्कृती, चालीरिती यावरून त्या त्या राज्याची ओळख असते. चित्रप्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते की, किती समृद्ध विचाराने ह्या चित्रकथा रेखाटलेल्या आहेत. कलाकार आपल्या कलेतून कला, संस्कृती जपत असतो. त्याची किंमत करता येत नाही. याठिकाणी चार कलाकारांनी एकत्रित या प्रदर्शनात विविध चित्रकथा रेखाटलेल्या आहेत.
माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा आणि बीना ठकरार यांनी रेखाटलेली चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
माजी खासदार श्री.दर्डा म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी रक्कम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
000
काशीबाई थोरात/विसंअ/1.9.22