उद्योग व्यवसायाबाबत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचे सहकार्य

आठवडा विशेष टीम―

 पुणे, दि. २: उद्योग व्यवसायाबाबत असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. पुणे महानगरात कोरोना कालावधीत उद्योजकांनी केलेले कार्य निश्चितच महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

आयसीसी ट्रेड टॉवर येथे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार गिरीश बापट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सुधीर मेहता, प्रशांत गिरबाने  आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पुणे महानगरात कोरोना कालावधीत  ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी करून ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासोबतच व्हेंटीलेटर तसेच इतर वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करून उद्योजकांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील आहे. विशेषत: गतीमान वाहतूकीच्या सुविधांवर भर देण्यात आला आहे.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गतीने सोडविण्यासोबतच रिंगरोड, विमानतळ तसेच उद्योग क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी राज्य शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास येत असून या मार्गामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होईल.या संपूर्ण प्रक्रियेतील खर्चासाठी राज्य सरकार योगदान देईल आणि या प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही  ते म्हणाले.

पुण्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

केंद्रीय मंत्री श्री.सिंधिया म्हणाले, आपल्या देशात हवाई वाहतूकीची प्रचंड क्षमता आहे. देशात ९ फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल्स सुरू केल्या आहेत, त्यामुळे प्रशिक्षणाची सुविधा वाढली आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधनावर व्हॅट कमी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे विमान वाहतूक उद्योगाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहरात उद्योग तसेच बाजारपेठेसाठी पोषक वातावरण असल्याने उद्योगवाढीसाठी तसेच उद्योग संबंधी प्रश्नांच्या सोडवणूकीसोबतच पुण्याच्या विकासासाठी आपले कायम सहकार्य असणार आहे. बालपणीपासून आपले पुणे महानगराशी वेगळे नाते असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिरबाने यांनी केले, उद्योग क्षेत्रातील प्रगतीबाबत त्यांनी  माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.