प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीच्या उदय

आठवडा विशेष टीम―

संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल होता मात्र मराठी भाषिक प्रदेश असलेल्या मराठवाड्यात निजामशाही होती. शिक्षणाची आभाळ होती, काही शाळा होत्या पण त्यांची भाषा उर्दू होती. 1917 ला हैद्राबाद मध्ये एक उस्मानिया विद्यापीठ व 1927 मध्ये औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेज स्थापन झाले.

आजुबाजूच्या विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र , दक्षिण महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता होती, ब्रिटिश आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत आग्रही होते. त्यामुळे तिथल्या जनतेचे शिक्षण होत होते. मात्र मराठवाड्यात आधुनिक शिक्षण शिकण्याला मर्यादा येत होत्या त्याचबरोबर निजामी संस्थानामध्ये मराठवाड‌्यातील लोकजीवनावर चौफेर सांस्कृतिक आक्रमण चालू होते.

सांस्कृतिक चळवळीचा उदय

स्वातंत्र्याच्या चळवळी इतर भागात आकार घेत होत्या. त्यामुळे मराठवाड्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकं जागृती मूळ धरत होती. लातूरमध्ये पुण्यावरून येऊन लोकमान्य टिळकांनी इ.स.1891 साली पहिली जिनिंग प्रेस काढली. त्यातून राजकीय जागृतीचं पाऊल मराठवाड्यात पडलं.. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांनी हिंगोली, परभणीस भेट दिली होती.
1901 साली परभणीत गणेश वाचनालय सुरु झाले ते मराठवाड्यातील सर्वात पहिले वाचनालय होते. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा येथेही वाचनालय सुरु झाली. 1 ऑगस्ट 1920 रोजी औरंगाबाद येथे बलवंत वाचनालय स्थापन झाले. आ.कृ.वाघमारे हे या वाचनालयाचे प्रवर्तक होते.

खाजगी शाळा या राष्ट्रीय भूमीकेतून कार्य करु लागल्या. सरकारचे धोरण खाजगी शाळांबाबत फारसे अनुकूल नव्हते तरीही इ.स. 1935 च्या सुमारास 20 खाजगी शाळा राष्ट्रीय भावनेतून सुरु झाल्या. त्यात परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भूवन विद्यालय, शारदा मंदिर हिप्परगा येथील राष्ट्रीय विद्यालय, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, योगेश्वरी विद्यालय, अंबाजोगाई, श्यामलाल विद्यालय, उदगीर, ज्युबिली विद्यालय, लातूर, नुतन विद्यालय, सेलू, राजस्थान विद्यालय, लातूर, भारत विद्यालय,उमरगा, चंपावती विद्यालय, बीड, नूतन विद्यालय, उमरी, प्रतिभा निकेतन, नांदेड, मराठा हायस्कूल,औरंगाबाद असा क्रम लागतो. यामागे स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा होती. वरील शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जागृतीचे कार्य केले. शारदा मंदिर शाळेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली. तर मराठा शिक्षण संस्थेने बहुजनांसाठी शिक्षणाची व्दारे खुली केली.

साहित्य विषयक चळवळी सुरु झाल्या

उर्दू भाषा शैक्षणिक व्यवस्थेतून राजभाषा बनली. त्यामुळे संस्थांनातील अन्य भाषा साहित्य व सांस्कृतीची गळचेपी होत गेली. या सांस्कृतिक संघर्षामुळेच साहित्य संस्थांचा जन्म झाला. साहित्य संस्थांनी राष्ट्रीय वृती जोपासली. इ.स. 1914 -15 मध्ये हैद्राबादेत दक्षिण साहित्य संघ स्थापन झाला. या कामात केशवराव कोरटकर व वामनराव नाईक यांनी पुढाकार घेतला. या साहित्य संघात अनेक मराठी तरुणांनी सहभाग घेतला. प्रारंभीच्या काळात विदर्भ साहित्य संघांशी ही शाखा संलग्न करण्यात आली. इ.स. 1931 मध्ये हैद्राबादेत महाराष्ट्र साहित्य संमेलन घेण्यात आले. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे अध्यक्ष होते. आ.कृ. वाघमारे यांनी संजीवनी साप्ताहिकात मराठी भाषेच्या विकासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. लक्ष्मणराव फाटक यांनी इ.स. 1920 मध्ये ‘निजाम विजय’ हैद्राबादहून सुरु केले. आ.कृ. वाघमारे यांनी दिनांक 10 फेब्रुवारी 1937 रोजी मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना केली. इ.स. 1937 मध्ये निजाम प्रांतीय मराठी साहित्य परिषद स्थापन झाली. तिचे पहिले अधिवेशन 1, 2 व 3 ऑक्टोबर, 1937 रोजी दादासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबाद येथे झाले. दुसरे अधिवेशन नांदेड येथे दिनांक 28 ते 30 सप्टेंबर, 1943 मध्ये दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. इ.स. 1944 मध्ये तिसरे अधिवेशन औरंगाबाद येथे ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यामुळे मराठवाड्यात सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीमुळ धरू लागल्या त्यातून अप्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या चळवळीचे बीजे पेरली जाऊ लागली.

क्रमशः

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button