गणपती विसर्जन रथाच्या मिरवणूकीला मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली सुरूवात

आठवडा विशेष टीम―

नाशिक, दिनांक 9 सप्टेंबर, 2022(आठवडा विशेष वृत्तसेवा) : शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची  ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील ,नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यास‍ह शहरातीत विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक उत्सवात दाखल गुन्हे शासनाने घेतले मागे

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गणेशोत्सव व दहिहंडी सारख्या उत्सवांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे महाराष्ट्र शासनाने मागे घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या जोषात व उत्साहात साजरा करीत आहोत. सायंकाळी पावसाच्या अंदाजाने मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री गिरिश महाजन यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत केला प्रारंभ

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा

गजर करून विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या रथांना मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच मिरवणूक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना केले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.