शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

ठाणे, दि. १० (आठवडा विशेष) : पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.

जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने गोवेली येथे आयोजित  प्रवचनकार व किर्तनकारांच्या सत्कार कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते.

आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, नरेंद्र पवार, संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे, रेश्मा मगर, अरुण पाटील, चंद्रकांत कोष्टे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रा. राजाराम कापडी लिखित ग्रंथालय संघटन आणि सुनीलदत्त तवरे लिखित संतांचे तत्वज्ञान या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन श्री पाटील यांच्या हस्ते झाले. दृष्टिमित्र साकीब गोरे यांचा सत्कार करण्यात आला. सुविधा केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

कीर्तनकार नवनित्यानंद महाराज उर्फ मोडक महाराज यांच्यासह परिसरातील किर्तनकारांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.

1 313

श्री. पाटील म्हणाले की, देशात आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जे जे शिकायचे आहे ते ते शिक्षण मिळेल. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे समग्र ज्ञान मिळेल. त्यामुळे हे शिक्षण मातृभाषेतून व्हावे यासाठी मा. प्रधानमंत्री आग्रही आहेत. तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी व कायद्याचे शिक्षण हे मातृभाषेतून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जगाची ज्ञानाची गरज भारत पूर्ण करेल.

कीर्तनकार हे लोकांच्या मनात उतरत उतरून समाजाला दिशा देण्याचे काम करतात. नवीन शैक्षणिक धोरण पोचविण्याचे काम किर्तनकार व प्रवचनकारांनी करावे, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी किसन कथोरे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी टिकवताना विकास हा हेतू ठेवला आहे. अंबरनाथ, मुरबाडसारख्या ग्रामीण भागात जीवनदीप शैक्षणिक संस्थेने शिक्षणाचा विकास करून या भागातील मुलांना दिशा दिली आहे. मतदार संघातील ग्रामीण भागातील महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संस्थेचे संस्थापक श्री घोडविंदे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.