प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करावेत

आठवडा विशेष टीम―

सातारा दि.10: जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून अजूनही तीन ते चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता गृहित धरुन सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन लवकरात लवकर एकत्रितच अहवाल सादर करण्यात यावा, म्हणजे आवश्यक ती मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीपिकाच्या नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठक नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली. त्यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचेसह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 यावेळी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतपिकाचे, शेतजमिनीचे नुकसान, घर पडझडीचे नुकसान, पशुधनाचे नुकसान यासर्व बाबींचा मागील आठवड्यातील व पुढील तीन-चार दिवसांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान होईल त्याचा संबंधित विभागाने नुकसान भरपाईचा एकत्रित अहवाल लवकरात लवकर सादर करावा, म्हणजे निधीची तात्काळ तरतूद करता येईल.  ज्या पाझर तलावांचे नुकसान झाले आहे त्याचाही अहवाल सादर करावा. तसेच जे निकषात बसत नाही, परंतू नुकसान झाले आहे असा प्रस्तावही विशेष बाब म्हणून सादर करावा.

रस्ते, वीज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासारख्या व अन्य सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचे परिपूर्ण प्रस्तावही सादर करण्यात यावेत. ज्या कुटूंबांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्यांना प्रशासनाने तातडीची मदत देण्याची व्यवस्था करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button