एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

यवतमाळ, दि. 10 सप्टेंबर (आठवडा विशेष) :-  अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे संकटात सापडलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये.  यासाठी नुकसानग्रस्त शेतीचे शिल्लक राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज दिले.

दारव्हा उपविभागातील लाखखिंड, खेड, पळशी व तरोडा या गावात शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करून मंत्री संजय राठोड यांनी दारव्हा विश्रामगृह येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

नाल्याचे पाणी घुसल्याने शेत पिकांचे नुकसान झाले, त्याभागातील सर्व नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करून घेण्याच्या सूचना मंत्री राठोड यांनी दिल्या. दारव्हा उपविभागात सात मंडळापैकी चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे, या नुकसानग्रस्त  भागात मदत मिळणारच आहे, पण उर्वरित तीन मंडळात देखील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या मंडळातील शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी सततच्या पावसाने नुकसानग्रस्तांच्या यादीत त्यांचा समावेश करावा, अशा सूचना मंत्री राठोड यांनी दिल्या.

1 677

 शेतात पाणी साठल्यामुळे पडलेली रोपे सरळ उभी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासही त्यांनी सांगितले. दारव्हा व दिग्रस भागात विद्युत वाहक तारेची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने विद्युत प्रवाह खंडित होऊन शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास होतो. विद्युत विभागाने अशा चोरीला अटकाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना ना. राठोड यांनी दिल्या.

ना. राठोड यांनी लाखखिंड येथे पंडीत राठोड व संजय बानावत यांच्या शेतात तसेच पळशी येथे सुनिल मदनकार व तरोडा येथे अरूण मादनकर आणि नरेश मादनकर यांच्या शेतात पाहणी केली तसेच खेड नाल्याची देखील पाहणी केली.

 यावेळी तालुकास्तरी यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.