प्रशासकीयब्रेकिंग न्युज

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.११ : उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील चौघा यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपुर्द झाले. या दु:खद प्रसंगात मुख्यमंत्र्यांनी केलेली तातडीची मदत नातेवाईकांसाठी दिलासा देणारी ठरली.

पालघर जिल्ह्यातील काही यात्रेकरु ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय ४३ वर्षे), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय ४० वर्षे), पुरुषोत्तम खिलखुटी (वय ३७ वर्षे), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय ५३ वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करुन त्यांनी जखमींवर उपचाराची माहितीही घेतली.

अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले, तेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आले, त्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

इतक्या जलदगतीने संपूर्ण सोपस्कार पार पाडून कोणत्याही अडचणींशिवाय पार्थिव नातेवाईकांकडे सुपुर्द केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तसेच प्रशासकीय गतिमानतेचे कौतुक होत आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, हेच यातून अधोरेखित झाले आहे, अशी भावना अपघातग्रस्तांचे नातेवाईक दयानंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button