सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

आठवडा विशेष टीम―

सातारा, दि. 13 : लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी चर्म रोग प्रादुर्भावाबाबत सद्यस्थितीचा आढावा मंत्री श्री. देसाई यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (दूरदृश्यप्रणालीद्वारे), सातारा जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, लम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिसरातील पशुधनास तातडीने लसीकरण करावे.

ज्या गावांमधील पशुधनास लम्पी आजाराची लागण झाल्याचे समजताच तात्काळ भेट देऊन पशुधनास उपचार करावे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सज्ज रहावे. लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडूनही मदत केली जाईल. जिल्ह्यातील पशुपालकांनी पशुधनास लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून औषधोपचार करावेत, असे आवाहन मंत्री श्री. देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

जिल्ह्यात 46 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून त्यापैकी 17 हजार 241 लसमात्रांचा वापर करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले. 26 हजार 659 लसमात्रा शिल्लक असून त्याद्वारे लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे. तसेच पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाकडे 2 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/13.9.22

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.