निरोगी मातृत्व हेच सशक्त भारताचे भविष्य : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

आठवडा विशेष टीम―

75 आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर माता तपासणी शिबिरांचा शुभारंभ

नाशिक, दिनांक 13  : मानवतेच्या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा जोडली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मातेचे आरोग्य निरोगी असणे महत्वाचे असून ज्यामुळे निरोगी मातृत्वातून सशक्त भारताचे भविष्य घडणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्ह्यातील 75 आरोग्य केंद्रावर गरोदर मातांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा शुभारंभ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. त्यावेळी डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड या दूरदृष्यप्रणालीद्वारे तर आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. सुनिल राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, चांदवड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाल्या की, सशक्त व सुदृढ पिढी तयार करण्यासाठी त्याची सुरूवात मातेच्या गर्भधारणेपासून होणे आवश्यक आहे. गरोदरपणाच्या काळात प्रत्येक मातेला चौरस आहार मिळणे, तिच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच अतिजोखमीच्या मातांचा शोध घेवून त्यांना गरोदरपणात लागणाऱ्या आरोग्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मातांना सुरक्षा व सुरक्षित मातृत्व देण्यासाठी अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत. यात गरोदर मातांची नोंदणी, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी सुरक्षा योजना, नियमित लसीकरण अशा अनेक योजनांच्या माध्यमातून मातांना आरोग्य विषयक आवश्यक

सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सर्व आरोग्य यंत्रणेच्या मदतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर मानवतेचा संदेश देणारे आहे. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत सहजतेने पोहाेचून त्यांना रुग्णसेवा व औषधोपचार पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. आपल्या संसस्कृतीमध्ये मातेला आदराचे व सर्वोच्च स्थान असून आपण भारत मातेप्रती समर्पित भावना जपतो, याच भावनेतून गर्भवती महिला, मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे आवाहन ही डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड म्हणाल्या की, गरोदरपणात महिलेला योग्य व सकस आहार तसेच आरोग्य सुविधा मिळाल्यास जन्मत: कुपोषित असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी होईल, त्यादृष्टिने जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. तसेच गरोदर मातांसाठी ॲनॉमली स्कॅनची  सुविधा आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 75 आरोग्य केंद्रांवर ही शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. या  शिबिरांच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणाऱ्या गरोदर महिला व अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या आरोग्याप्रती जागृत राहून विशेष काळजी घेण्यात येणार आहे, असेही  लीना बनसोड यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातील आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शिबिरामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

00000000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.