मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.१३ : सामान्य मुंबईकरांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून २ ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबईत सुमारे २२७ आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ५० आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे १३९ वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठीदेखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहे. सध्या ५० ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत २२७ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ३४ पॉलिक्लिनिक असणार आहेत. त्याद्वारे विशेषज्ञांची सेवा मिळणार आहे. पोर्टाकॅबिन आणि पक्के बांधकाम अशा दोन स्वरूपात हे क्लिनिक चालविण्यात येणार आहे.

साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येकरिता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येईल. सकाळी सात ते दोन, दुपारी तीन ते रात्री दहा अशी रुग्णाच्या सोयीनुसार दोन सत्रात या दवाखान्याची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक एम बी बी एस डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल.पॉलिक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात आहे. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.