अभियंता दिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभेच्छा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : देशभरात उद्या गुरुवार 15 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनानिमित्त राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या सर्वच पातळ्यांवर सर्वोच्चस्थानी नेण्याचा निर्धार केला आहे. देशाच्या या निर्माण कार्यात अभियंत्यांचे योगदान फार महत्त्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य शासनामार्फत यापुढील काळातही अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येईल. अभियंता दिनानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/14.9.22

 

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.