यापुढे राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते करणार

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अनेक पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार राजकारण्यांच्या हस्ते देण्याऐवजी पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांचे कुटुंबीय यांच्या हस्ते राज्याची शान असलेल्या या सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश आज सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिले. सह्याद्री अतिथीगृहात आज झालेल्या सांस्कृतिक खात्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

संपूर्ण देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. याच निमित्ताने येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.येत्या 2 ऑक्टोबर रोजी नदी महोत्सवाचाही शुभारंभ होत असून यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय दिवाळीनिमित्त 6 महसूली विभागात दिवाळी पहाट आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पंढरपूर येथे राज्यस्तरीय किर्तनकार प्रवचनकार संमेलन घेण्यात येणार

समाजातील प्रत्येकाचे वेगवेगळया स्वरुपात प्रबोधन करण्याचे काम कीर्तनकार, प्रवचनकार करत असतात. या सर्वांना एकत्र करुन लवकरच किर्तनकार प्रवचनकारांचे संमेलन पंढरपूर येथे आयोजित करण्यात यावे अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

 

श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी विभागामार्फत वेगवेगळया समित्या नियुक्त करण्यात येतात. या सर्व नियुक्त्यांचे एक बुकलेट तयार करणे आवश्यक आहे.तसेच या समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या अशासकीय सदस्यांची निवड कोणत्या निकषाच्या आधारे करण्यात येते हे निकषही तयार करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात या विभागाची दर दोन महिन्यांनी विस्तृत बैठक घेण्यात येईल आणि या बैठकीमध्ये या सगळया बाबींचा आढावा घेण्यात येईल.

पुरस्कार वितरणाचे वेळापत्रक ठरवा

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली अनेक संचालनालय येतात. या संचालनालयामार्फत आणि विभागामार्फत दरवर्षी काही पुरस्कार देण्यात येतात. हे सर्व पुरस्कार वितरणांचे एक वेळापत्रक ठरवून दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळातच ते पुरस्कार त्याच दिवशी वितरीत होतील असे नियोजन करण्यात यावे असेही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात असलेल्या 52 नाटयगृहांचे अत्याधुनिकीकरण आणि सुशोभीकरणावर भर देण्यात यावा. त्यासंदर्भातील वेळापत्रक तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला यावेळी दिले. ही सर्व नाट्यगृहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मुंबईत मंत्रालय आणि रवींद्र नाट्य मंदिराशी जोडली जातील असेही त्यांनी सांगितले.याशिवाय राज्यात असलेल्या विविध भजनी मंडळाची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र ॲप विभागाने विकसित करावे अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. सौरभ विजय, उपसचिव श्री.विलास थोरात, श्रीमती विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक‍ श्री.बिभीषण चवरे, पुराभिलेख संचालक श्री.सुजीत उगले, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक श्री. संतोष रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.