रायगड जिल्ह्यातील चिर्ले परिसरात निर्माण होणार नवीन ग्रोथ सेंटर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 14 : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 84 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवडी येथून सुरू झालेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष सागरी सेतूवर जाऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी एम एम आर डी एचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी कामाबाबत माहिती दिली.

trans harbour1

दिवसाला एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुंबईला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा हा २२ किमी लांबीचा देशातील सर्वाधिक मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा करण्याची क्षमता असून नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचे काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची देखील काळजी घेण्यात आली असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त फ्लेमिंगो आल्याचे त्यांनी सांगितले. या सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटात पार करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एम टी एच एल प्रकल्प ईस्टर्न फ्री वेला जोडणार

राज्याच्या सकल उत्पन्नात सर्वाधिक वाटा मुंबई महानगर क्षेत्रातून येत असून या भागातील नागरिकांना हा  प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प ईस्टर्न फ्री वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार आहे. शिवाय मुंबई – वरळी कोस्टल रोड देखील शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ओएसडी जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर

या प्रकल्पाचे काम करताना ऑर्थोटॉपीक स्टील डेस्क (ओएसडी) या जपानी तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर पहिल्यांदाच करण्यात आला आहे. त्याचे वजन काँक्रीटपेक्षा कमी असून वेगाने काम होण्यास मदत होत आहे. पर्यावरणपूरक असा हा प्रकल्प असून त्याच्या माध्यमातून वर्षाला सुमारे २६ हजार टन कार्बनडायऑक्साईड कमी होणार आहे तीन पॅकेजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी शिवडी प्रकल्प कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. श्रीनिवास यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.