आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. १५ :- राष्ट्रीय अभियंता दिनाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा करण्यात येतो ते महान अभियंता भारतरत्न सर एम. विश्र्वेश्र्वरय्या यांना विनम्र अभिवादन केले आहे.
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना मनापासून शुभेच्छा. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला स्वयंपूर्ण करण्यात आपल्या अभियंत्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणी केली आहे. प्रगत राष्ट्रांनीही दखल घ्यावी असे प्रकल्प, उद्योग-कारखाने उभे केले आहेत. अभियंत्यांच्या या योगदानामुळंच आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा, कृषी-सिंचन, औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रातील वैभवात भर घातली गेली आहे. आपल्या महाराष्ट्रानंही अभियांत्रिकी क्षेत्रातील चमक अनेक अर्थानं सिद्ध केली आहे. त्यामुळंच आपलं राज्य देशाच्या औद्योगीक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखलं जातं. गतिमान आणि बलशाली असा आधुनिक भारत उभा करण्यात अभियंत्याच्या या योगदानाला आपण दाद द्यावीच लागेल. त्यांच्याकडून यापुढेही राष्ट्रउभारणीत असेच योगदान दिले जाईल, असा विश्वास आहे. अभियंता दिनानिमित्त देश आणि राज्यभरातील अभियंत्यांना मनापासून शुभेच्छा आणि भारतरत्न सर एम. विश्र्वेश्र्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
000